प्रत्येकाने स्वतः च्या अंतर्मनात डोकावून नोकरी करावी
भुसावळातील रोजगार मेळाव्यात रामचंद्र येवले यांचे प्रतिपादन
भुसावळ : नोकरी मागताना व करतांना प्रत्येकाने आपल्या अंतर्मनात डोकावून विचार करावा व मिळालेल्या नोकरीला दाद द्यावी, असे प्रतिपादन कौशल्य विकास, पुणेचे संचालक रामचंद्र येवले यांनी रोजगार मेळाव्यात केले. रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्स व सिद्धवेद इन्फोटेकच्या संयुक्त विद्यमाने भुसावळात संतोषी माता हॉलमध्ये मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कौशल्य विकासचे उपाध्यक्ष योगेश जाधव, संचालक विशाल कुंजीर, नीरज त्यागी (दिल्ली), नगरसेवक निर्मल कोठारी, रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव विनोद तायडे व सिद्धवेद इन्फोटेकचे संचालक महेश फालक उपस्थित होते.
कोरोनाने हिरावला रोजगार : उमेश नेमाडे
प्रास्ताविकात रोटरी रॉयल्सचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी कोरोना काळात बहुतेक लोकांचा रोजगार हिरावून गेला. आर्थिक परिस्थिती डळमळीत झाल्याने त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा रोटरी रॉयल्सचा प्रयत्न असल्याचे सांगितले. मेळाव्यात 30 कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते, मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 1327 उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या. पैकी बर्याच युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांची निवड झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना तायडे यांनी केले तर आभार रोटरी रॉयल्सचे कोषाध्यक्ष गणेश फेगडे यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी रोटरी रॉयल्सचे चैत्राम पवार, मोहन पाटील, प्रसन्न पांडे, अनुप ठाकूर, धीरज धांडे, सागर विसपुते, किरण ठाकूर, रमेश पांडव, अनंत वाटपाडे, आरिफ गवळी, शुभम महाजन, शुभम खंडेलवाल, राजेश पोतदार, प्रशांत सुतोणे, कैलास सैंदाणे तसेच सिद्धवेद इन्फोटेकच्या कर्मचारी वर्गाने परीश्रम घेतले.



