शिरसाड गावात पाणी सोडल्यावरून दोन गटात हाणामारी : आठ जणांविरुद्ध गुन्हा


यावल : तालुक्यातील शिरसाड येथे शुक्रवारी रात्री पाणी सोडल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यानंतर पोलीस घटनास्थळी आले तरीदेखील हाणामारी थांबली नसल्याने पोलिसांनी फिर्यादी होत सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्या फिर्यादीनुसार आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलीस ठाण्यात कुणीतरी शिरसाड येथे सुरू असलेल्या हाणामारीची माहिती कळवल्यानंतर पोलिस पथक गावात आले. तरीही दोन्ही गट ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे दोन्ही गटातील रमेश रामचंद्र इंगळे, अरुण पुना जाधव, प्रभाकर पुना जाधव, गौतम रमेश इंगळे यांच्यासह चार अज्ञात महिला या सर्वांविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय देवरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !