बोदवड तालुक्यात कॉपर केबल चोर्यांचा उलगडा ः सहा आरोपी जाळ्यात
बोदवड पोलिसांची कामगिरी : अन्य तीन पसार आरोपींचा कसून शोध सुरू
बोदवड : बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या शेतातील केबल वायरची चोरी करणार्या सहा जणांच्या टोळीला बोदवड पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून एक लाख 45 हजार 500 रुपये किंमतीचे कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे. अनेक गुन्हे या टोळीच्या अटकेनंतर उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, चोरीचा माल घेणार्या दोघांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
या आरोपींना अटक
बोदवडचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना टोळीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 11 रोजी संशयीत चेतन प्रमोद नेहते (नाडगाव, ता. बोदवड) यास ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर चोरीची कबुली देत अन्य साथीदारांची नावे सांगितले. संशयीत अविनाश बाबू माळी (भिलवाडा, बोदवड), किसन भीमा मोरे (28), स्वराज प्रकाश मालचे (30, दोन्ही रा.न.हं.रांका हायस्कूलसमोर, जामनेर रोड बोदवड) यांना अटक करण्यात आली तर आरोपींकडून चोरीचा माल घेणार्या रहिम शहा बशीर शहा (48, बोदवड) व शेख अय्युब शेख कालू (58, बोदवड) यांनाही आरोपी करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, टोळीतील ाना दगडु मोरे (भिलवाडा, बोदवड), विक्रम गायकवाड व नितीन गायकवाड (दोन्ही रा.भिलवाडा, बोदवड) हे पसार असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.



या भागात आरोपींनी केल्या चोर्या
बोदवड पोलीस स्टेशन हद्दीतील नाडगाव, जुनोना, हिंगणा, नांदगांव, कुन्हा हरदो, राजुर शिवारात आरोपींनी शेतातील केबल वायरची चोरी केली होती. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक लाख 45 हजार 500 रुपये किंमतीची एक क्विंटल 45 किलो ग्रॅम केबल वायर जप्त करण्यात आली. आरोपींविरोधात गुरनं. 211/2021 भादंवि 379, 411 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, हवालदार अय्युब तडवी, नाईक सचिन चौधरी, नाईक शशीकांत महाले, कॉन्स्टेबल निखील नारखेडे, मुकेश पाटील, तुषार इंगळे, निलेश सिसोदे, चालक वसीम तडवी आदींच्या पथकाने केली.
