चोरीच्या म्हशी विकण्याच्या प्रयत्नात चौघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
सावदा : सावदा येथून जवळच असलेल्या मोठा वाघोदा येथून 13 रोजी रात्री किशोर सीताराम महाजन यांच्या मालकीच्या 2 म्हशी चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सावदा पोलीसात किशोर महाजन यानी फिर्याद दिल्यावरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास सुरू असताना खामगाव, जि.बुलढाणा येथील पोलिसांना सुगावा लागला की, तेथील प्रसिद्ध गुरांच्या बाजारात काही इसम चोरीच्या म्हशी विक्रीसाठी आले आहेत. याबाबत चार संशयित यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सुरूवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी याबाबत कबूली दिली. यात किरण उर्फ राजू गोपाल कोळी, दीपक बाळु वाघ, गोविंद सुशील वाघ (सर्व रा. वाघोदा बु, ता.रावेर) व संजय उर्फ पिंटू पंढरीनाथ बावचे (रेल्वे स्टेशन वाघोदा बु.) यांना अटक करण्यात आली, आरोपींच्या ताब्यातून 85 हजार रुपये किंमतीच्या म्हशी व तीन लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. खामगाव पोलिसांनी ताब्यातील आरोपींना सावदा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई खामगाव पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. निरीक्षक पी.आर.इंगळे व सहकाऱ्यांनी केली. अधिक तपास सावदा सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय चौधरी, उमेश अढाईगे व सहकारी करीत आहे.




