भुसावळात रेल्वे रोको आंदोलन रोखले : राष्ट्रीय दलित पँथरचे प्रशासनाला निवेदन
भुसावळ : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पँथरचे शनिवारी दुपारी दोन वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन होणार होते मात्र प्रशासनाने आंदोलकांना रेल्वे स्थानकाबाहेरच रोखल्याने आंदोलन होवू शकले नाही तर विविध मागण्यांचे निवेदन यावेळी स्टेशन मास्तर यांना राष्ट्रीय दलित पँथरचे प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे व राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ सोनवणे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या घोषणाबाजीने परीसर दणाणला होता.
या मागण्यांसाठी रेल्वे रोकोचा इशारा
लखीमपूर येथे आंदोलन करणार्या शेतकरी आंदोलक लोकांना अजय मिश्रा यांचे चिरंजीव यांनी चारचाकी गाडीने चिरडले त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शेतकर्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, भुसावळ येथील रेल्वे प्रशासनाने काढलेल्या अतिक्रमणामुळे त्यांचा निवारा गेला. त्यामुळे विस्तापीतांना तातडीने पुर्नवसन करावे व प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांची नुकसान भरपाई द्यावी, संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावे, ईगतपुरी-कसारा दरम्यान पुष्पक एक्स्प्रेस गाडीत 8 ऑक्टोबरला झालेल्या लूटमार व अत्याचार प्रकरणी संशयीतांना कडक शासन व्हावे आणि या गाडीतील सुरक्षा रक्षक आणि संबंधित अधिकार्यांना निलंबीत करावे, ज्या प्रवाशांची लूटमार झाली आहे. त्या प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी रेल्वे रोकोचा इशारा देण्यात आला होता. शनिवारी दुपारी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रेल्वे स्थानक गाठले मात्र रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच आरपीएफ व जीआरपी पोलिस व अधिकारी यांनी आंदोलकांना रोखले. आंदोलकांनी प्रवेशद्वाराजवळच घोषणाबाजी करीत स्टेशन मास्तर यांना वरील मागण्याचे निवेदन दिले.



यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात राष्ट्रीय दलित पँथरचे प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हिरोळे, राजू तायडे, अल्केश मोरे, शांताराम नरवाडे, सुनील रायमोळे, छोटेलाल हरणे, मयुर सुरवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बाजारपेठ पोलीसस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, जीआरपी व आरपीएफचे निरीक्षक आदींनी बंदोबस्त राखला.
