प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना विमा उतरविण्यासाठी मुदत वाढ द्यावी
खासदार रक्षा खडसे यांची कृषिमंत्र्यांसह कृषि सचिव व पालकमंत्र्यांकडे मागणी
मुक्ताईगनर : चालू वर्षाच्या प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विना कर्जदार शेतकर्यांकरीरता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत शनिवार, 30 ऑक्टोबर निर्देशित केली आहे. पीक विमा उतरविण्यासाठी 7/12 उतार्याची आवश्यकता असून, शेतकर्यांना शेतीचा 7/12 उतारा मिळण्यासाठी तलाठी संघाच्या कामबंद आंदोलनामुळे अडचणी येत आहे, त्यासाठी फळ पीक विमा योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी सचिव एकनाथ डवले व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तलाठी संघाच्या काम बंद आंदोलनाने अडचणी
मागील काही दिवसांपासून तलाठी संघाचे काम बंद आंदोलन सुरू असून तलाठी बांधवांच्या संपामुळे शेतकर्यांना शेताचा 7/12 उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. केळी पीक विमा उतरविण्याची शनिवार, 30 ऑक्टोबर अखेरची मुदत आहे परीणामी शेताच्या उतार्याअभावी शेतकरी बांधव केळी पीक विमा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्याबाबत शेतकर्यांना उतारा मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जळगाव जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. आधीच अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचे संकटामुळे शेतकरी संकटात असताना पुन्हा त्यांचे नुकसान होवू नये, असा आशावाद खासदार रक्षा खडसे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे.



