वीज बिल वसुली न थांबल्यास तीव्र आंदोलन : रावेरात शिवसेनेचा इशारा
रावेर : खरीप हंगामातील उत्पादन येण्याच्या काळात पावसाने जोरदार तडाखा दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अस्मानी संकटातून शेतकरी जात असताना वीज वितरण कंपनीने घरगुती व शेती पंपांच्या थकीत वीज बिल वसुलीचा धडाका लावल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ही मोहिम वीज कंपनीने त्वरीत न थांबविल्यास येथील वीज कंपनीच्या उप विभागीय कार्यालयासमोर शुक्रवार, 29 रोजी आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख योगीराज पाटील यांनी दिला आहे.
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
तालुक्यातील कापूस, केळी, मका, ज्वारी यासह इतर पिकांचा हंगाम पावसाने नष्ट झाला आहे. उत्पादन खर्चही निघालेला नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे मात्र वीज कंपनी थकीत वीज बिल असलेले कनेक्शन तोडण्याची मोहिम राबवित आहे. कनेक्शन तोडण्याची व वसुलीची मोहीम न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा उप विभागीय अभियंता अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी नितीन महाजन, वसीम खान, राकेश घोरपडे, सुरेश शिंदे, संतोष महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



