चुंचाळेतील दोघा भावंडांना चुलत भावानेच विहिरीत ढकलले


आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा : सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याने मुलांना फेकले विहिरीत

यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील दोघा अल्पवयीन भावंडांचे मृतदेह गुरुवारी दुपारी त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळले होते. पोलिसांनी चौकशीअंती या गुन्ह्याचा उलगडा करीत मुलांच्या चुलत भावाला अटक केली आहे. आरोपीला कुटुंबाकडून मिळणार्‍या सापत्न वागणुकीमुळे त्याने मुलांना विहिरीत फेकल्याची कबुली दिली. या प्रकरणी यावल पोलिसांनी निलेश सावळे (32) यास अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेत रीतेश रवींद्र सावळे (6) व हितेश रवींद्र सावळे (5) या चिमुकल्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माता-पित्यांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

होय, मीच मुलांना ढकलले विहिरीत
वडिलोपार्जीत शेतीचे उत्पन्न दाखवले जात नाही, नोकरासारखी वागणूक मिळते, बुधवारी सकाळी सर्वजण जेवायला बसलो तेव्हा मला एकच पोळी दिली, इतर सर्व पोटभर जेवले परत दुपारी 12 वाजता दोघा पोरांना जेऊ घातले मला विचारलेदेखील नाही, याचा राग मनात होता. बुधवारी मी शेतातील विहिरीवर बसलो होतो. तेव्हा दोन्ही पोरं विहिरीत दगड टाकत होते. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी मला दगड मारला त्यामुळे संतापात मी दोघांना विहिरीत टाकले, अशी कबुली संशयित नीलेश सावळे याने पोलिसांना दिली. संशयिताने कबुली दिल्याने पोलिसांनी विहिरीत पट्टीच्या पोहणार्‍यांच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता काढण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. गुरुवारी रात्री दोन्ही बालकांवर चुंचाळे येथे अंत्यसंस्कार झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !