मोबाईल रीजार्जच्या माध्यमातून लाखोंना गंडा घालणार्या आरोपीला बेड्या
जळगाव सायबर सेलची कामगिरी : दहा महिन्यानंतर अटक करण्यात आले यश
जळगाव : मोबाईल रीचार्ज बॅलन्स उपलब्ध करून देण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑनलाईन मोबाईल अॅप्लीकेशन तयार करून लोकांकडून लाखो रुपये उकळत पोबारा करणार्या आरोपीच्या दहा महिन्यानंतर मुसक्या आवळण्यात जळगाव सायबर सेलला यश आले. समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (रा.आरएन पार्क अपार्टमेंट, रामनगर, मेहरुण ) असे अटकेतील आरोपी नाव आहे.
जळगावातील अनेकांना गंडा
खान याने गतवर्षी बीग किंग व्हॅलेट व अतीया पे वर्ल्ड हे दोन बेकायदेशीर अप्लीकेशन तयार केले. या वेबसाईटवर अनेक लोकांना लिंक केले. या माध्यमातून त्याने रिचार्ज बॅलेन्स देण्यासाठी जास्त कमिशन देण्याचे आमीष नागरीकांना दिले होते. त्यानुसार अमान इरफान अन्सारी (रा.फातीमानगर, एमआयडीसी) यांना 17 लाख 45 हजार 324 रुपयांमध्ये गंडवले. तसेच भाविक रमेशचंद वेद, मोहम्मद नासिर अन्वर हुसेन, रिजवान अहमद शेख रमजानी, अशफाक खान अयुब खान, डॉ.शेख फिरोज, अहमद इबने मोहम्मद युसूफ, शेख जहीर अहमद कासम, अल्ताफ खान अयुब खान, अल्ताफ मुनाफ खाटीक या लोकांकडून त्याने लाखो रुपये घेतले होते. तर लोकांना मोबदल्यात बॅलेन्स दिला नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी त्यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तकादा लावला होता. यामुळे खान हा कुटुंबियांसह जळगावातून पळून गेला होता. त्याचे घर बंद असल्याचे पाहुन नागरीकांनी त्याचा शोध देखील घेतला परंतू, तो मिळुन आला नाही. अखेर अमान अन्सारी यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा सायबर पोलिसांकडे तपासाला दिला होता. दरम्यान, पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, उपनिरीक्षक अंगत नेमाने, वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, दिलीप चिंचोले, अजय सपकाळे, आफ्रीन मन्सुरी यांच्या पथकाने त्याला भोपाळ शहरातील शामला हिल भागातून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्याला 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



भोपाळातून आवळल्या मुसक्या
खान हा इंदूर शहरात राहत असल्याची माहिती जानेवार 2019 मध्ये सायबर पोलिसांना मिळाली होती. या पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी इंदूर शहरात गेल होते. दरम्यान, पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर तो इंदूर शहरातून देखील बेपत्ता झाला होता. यानंतर तो झहीर खान असे नाव बदलून राहत होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारुन त्याला अटक केली.
