चिन्या मृत्यू प्रकरण : तत्कालीन कारागृह अधीक्षकासह पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील शिवाजीनगर हुडको येथील चिन्या उर्फ रविंद्र रमेश जगताप याचा न्यायालयीन कोठडीत असताना बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल १४ महिन्यांनी मंगळवारी तत्कालीन कारागृह अधीक्षकासह पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत अश्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत हा गुन्हा जिल्हापेठ पोलिसात वर्ग करण्याचे काम सुरु होते.




मारहाणीत चिन्याचा मृत्यू
जळगाव जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील , दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केला होता. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते मात्र त्यावेळी गुन्हा दाखल न झाल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली होती. दरम्यान, चिन्यांचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे . यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. मनोज जाधव या घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत . कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. आता १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता मयत चिन्याची पत्नी मीना जगताप यांच्या फिर्यादीवरुन तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या पाच जणांविरोधात नशिराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.
