लाचखोरांवर कारवाई करण्यात नाशिक परीक्षेत्रात जळगाव युनिट दुसर्या क्रमांकावर
पुणे, नाशिक पाठोपाठ नगर व जळगाव युनिटची कामगिरी सरस
भुसावळ : लाचखोरांवर कारवाई करण्यात नाशिक परीक्षेत्रात अहमदनगर युनिट प्रथम क्रमांकावर तर जळगाव युनिट दुसर्या क्रमांकावर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर 2021 अखेर सापळा रचून केलेल्या कारवाई स्वरूपात तसेच अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 754 गुन्हे दाखल झालेत. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परीक्षेत्राने सर्वाधिक म्हणजे 162 गुन्हे दाखल केलेत. यामुळे गुन्हे दाखल करण्यात व चालू वर्षाषाअखेरच्या कामगिरीत या परीक्षेत्राचा प्रथम क्रमांक लागला आहे तर नाशिक परीक्षेत्राने चालू वर्षाअखेर 127 गुन्हे दाखल करून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
नाशिक परीक्षेत्रात जळगाव युनिट द्वितीयस्थानी
नाशिक परीक्षेत्रातील जळगाव युनिटने सरत्या वर्षाअखेरपर्यंत 33 गुन्हे दाखल केले. मागील वर्षापेक्षा जास्तीचे 13 गुन्हे दाखल करण्याची कामगिरी करीत जळगाव युनिटने केली असून दुसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, अहमदनगर युनिटने नाशिक परीक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


लाचखोरीत पोलिस व महसूल विभाग अव्वल
सरकारी कामासाठी टेबलावर नोटांचे वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे न्यायचा नाही, असा सरकारी बाबूंनी नियम केल्याने लाचखोरांविरोधात जळगाव युनिटने दंड उपटले आहे. लाचखोरीत पहिला क्रमांक पोलिस विभागाचा तर दुसरा क्रमांक महसूल विभागाचा आहे. सन 2020 मध्ये जळगाव युनिटने 20 तर 2021 मध्ये तब्बल 33 सापळे यशस्वी केले आहे. या वर्षात तब्बल 13 सापळे अधिक झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पोलिस विभागातील ९ लाचखोरांवर कारवाई झाली. महसूल व पोलिस विभागातील प्रत्येकी ३ लाचखोरांवर कारवाई झाली. सार्वजनिक बांधकाम, एमएसइबी,आरोग्य व उपप्रादेशिक परिवहन विभागातील प्रत्येकी २ लाचखोरांवर कारवाई झाली. उर्वरित नऊ विभागातील प्रत्येकी एका लाचखोरांवर कारवाई झाली.
विश्वास वाढला आता अधिक जवाबदारी कारवाई : शशीकांत पाटील
लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर लोकांचा विश्वास वाढत असून त्यामुळेच कारवाई करणे शक्य झाले आहे. भ्रष्ट लोकसेवकांबाबत निसंकोच तक्रार करावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले. शासनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाच्या दृष्टीने कामकाज सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
