भरडधान्य खरेदी करताना पारदर्शकता जोपासावी : यावलला निवेदन
यावल : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर शेतकर्यांची फसवणूक टाळण्यात यावी तसेच धान्य खरेदीत पारदर्शकता असावी, अशी मागणी यावलचे तहसीलदारांकडे शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नायब तहसीलदारांना निवेदन
यावल तालुका शिवसेना शाखेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील (मुन्ना पाटील), शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले. शहरात भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला असून येथे धान्य खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता असावी तसेच भरडधान्य खरेदी करतांना घट्टी किती लागेल, शेतकर्याच्या धान्यास प्रतवारी अनुसार भाव कसा दिला जाणार यात सरकारी हमाली फी प्रति किलो/क्विंटल किती लागणार आदींची माहिती शेतकर्यांना मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या खरेदी केलेल्या धान्याची रक्कम खरेदी दराप्रमाणे तातडी धनादेशव्दारे देण्यात यावी व या विषयावर केंद्र संचालकांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील (मुन्ना पाटील) तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे , यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शहर उपप्रमुख संतोष धोबी, आदिवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी, सागर देवांग, अजहर खाटीक, पप्पू जोशी, संतोष वाघ, योगेश चौधरी, प्रदीप लोणारी, भरत चौधरी, प्रवीण अडकमोल, अनिल पाटील, किरण बारी, योगेश पाटील, नामदेव अडकमोल, सुधाकर धनगर यांच्या स्वाक्षरी आहे.


