आमोदा शिवारातून 50 हजारांचे इलेक्ट्रिक साहित्य लंपास
यावल : तालुक्यातील आमोदा शिवारातील रुद्रम तोलकाट्याच्या कॅबीनमधून 50 हजार 500 रूपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांनी साहित्य लांबवले
अनिकेत रोहिदास भिरूड (30, रा.किरंगेवाडा, फैजपूर, ता.यावल) यांचे यावल तालुक्यातील आमोदा शिवारातील शेत गट क्रमांक 141 मध्ये रुद्रम तोलकाट्या नावाची ट्रेडिंग कंपनी आहे. शनिवार, 8 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अनिकेत भिरूड हे काम आटोपून येथील कॅबीन बंद करून घरी गेले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कॅबीनमधील इलेक्ट्रिक साहित्य, वजन काटा, प्रिंटर, की बोर्ड असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. हा प्रकार रविवार, 9 जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी अनिकेत भिरुड यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे करीत आहे.


