खुषखबर ! : जळगावात आठवड्यातून पाच दिवस मुंबईसाठी विमानाचे उडान


जळगाव : विमान प्रवास करणार्‍यांसाठी खुषखबर आहे. आता जळगाव शहरातून आठवड्यातील पाच दिवस मुंबईसाठी विमान धावणार आहे. 17 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. या सोबतच तीन दिवस कोल्हापूर आणि दोन दिवस नांदेड या दोन शहरांशी नव्याने जळगाव एअर कनेक्ट होणार आहे. शहरवासीयांसाठी ही नव्या वर्षांतील भेट ठरणार आहे.
तीन वर्षांपासून अडखळत सुरू असलेल्या ट्रु-जेट या कंपनीच्या विमान सेवेने भरारी घेण्यास सुरुवात केल्याचे चिन्ह दिसत आहेत.

मुंबईसाठी प्रतिसाद वाढण्याचा अंदाज
जगातील व्यग्र विमानतळात मुंबई विमानतळाचा समावेश होतो. अशा स्थितीत जळगावातून मुंबईत विमानाला लॅण्ड होण्यासाठी दुपारी, संध्याकाळची वेळ यापूर्वी मिळत होती त्यामुळे विमानाने मुंबईत जावून वेळीची बचत होत नव्हती. त्यापेक्षा रात्री रेल्वेने कमी खर्चात आरामदायी प्रवास करता येत होता परंतु आता सकाळी 11 वाजता मुंबईत विमान पोहोचणार असल्याने त्याचा फायदा होवून दिवस कामी येईल. त्यामुळे प्रतिसाद वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय.





व्यापार्‍यांना मिळाला दिलासा
मंगळवार व गुरुवार नांदेडला विमानाने जाता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी अहमदाबादहून जळगावात सकाळी 9.30 वाजता विमान येवून ते 9.50 वाजता मुंबईसाठी रवाना होईल. तेथे 11 वाजता पोहोचल्यानंतर 11.40 वाजता ते नांदेडसाठी उड्डाण करेल. मुंबई ते नांदेड या फेरीसाठी विमान तिकीट सुमारे 2500 ते 3000 असेल. दरम्यान,
आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार सलग पाच दिवस जळगावातून अवघ्या सव्वा तासात तेही सकाळी 11 वाजता मुंबईत पोहोचता येईल. त्याचप्रमाणे काम आटोपून संध्याकाळी परत येणे शक्य होईल. या नवीन वेळापत्रकाचा लोकप्रतिनिधी, अधिकारी व उद्योजकांना फायदा होणार आहे.

कोल्हापूरसाठी तीन दिवस सेवा
सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवसांसाठी अहमदाबादहून विमान निघून सकाळी 9.30 वाजता जळगावात दाखल होईल आणि 9.50 वाजता मुंबईला उड्डाण भरेल. तेथे ते 11 वाजता पोहोचून 11.40 वाजता ते कोल्हापूरसाठी रवाना होईल. जळगाव ते मुंबईसाठी आरसीएस सेवा अंतर्गत 2299 रुपये अधिक कर एवढे तिकीट लागेल. तर मुंबई ते कोल्हापूरसाठी 3 हजारांपर्यंत तिकीट लागू शकणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !