‘गिरणा’ माईची दुरवस्था करणार्या वाळू माफियांवर कठोर कारवाई व्हावी
गिरणा परीक्रमा दरम्यान खासदार उन्मेष पाटलांकडे व्यक्त होताय संतप्त भावना
चाळीसगाव : जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा ध्यास घेऊन खासदार उन्मेष पाटलांनी गिरणा परिक्रम सुरु केली आहे. जळगावातून सुरु झालेल्या या परीक्रमेचा आज चौथा टप्पा भडगाव तालुक्यात पार पडला. या यात्रेच्या निमित्ताने खासदार उन्मेष पाटील पायी चालत ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या पदयात्रेला एकीकडे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे आपल्या गिरणामाईची ही दयनीय अवस्था करणार्या वाळू माफीयांवर ठोस कारवाई व्हावी, अशी देखील संतप्त भावना गावागावांतील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
बारमाहि वहावी गिरणामाई
गिरणा नदी बाराही महिने पूर्वीसारखी वाहिली पाहिजे, या प्रमुख उद्देशाने खासदार उन्मेष पाटील यांनी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हाती तिरंगा घेत, गिरणा परीक्रमा सुरु केली. गिरणा नदीकाठी असलेल्या कण्वऋषींच्या आश्रमापासून 1 जानेवारीला परिक्रमेची सुरवात झाली. जवळपास महिनाभर चालणार्या या पदयात्रेमुळे विशेषतः गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये गिरणा नदीबद्दल जनजागृती होत आहे. या यात्रेचा चौथा टप्पा आज भडगाव तालुक्यात पार पडला. या पदयात्रेच्या निमित्ताने गावागावात जाऊन खासदार उन्मेष पाटील हे आपल्या नदीचे संवर्धन करण्याचे आवाहन करीत असून गिरणा नदीतून बाराही महिने पाणी वाहू शकते आणि हे केवळ त्या त्या गावातील ग्रामस्थांमुळेच शक्य होऊ शकते हे पटवून देत आहेत. ग्रामस्थांनाही त्याचे महत्त्व पटत असल्याने या पदयात्रेला गिरणा नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे नदीची ही वाईट अवस्था करणार्याला राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफीयाच जबाबदार असल्याचाही आरोप गावागावांतून केला जात आहे.


वाळू उपशामुळेच वाईट अवस्था
गिरणा नदी कधीकाळी बाराही महिने वाहत होती. या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपलब्ध होत असल्याने या वाळूचा बेसुमार उपसा होत गेला आणि आजही सुरुच आहे. वास्तविक, नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासंदर्भात शासनाची नियमावली आहे. मात्र, वाळू माफीयांनी सर्व नियम धाब्यांवर बसवून वाळूचा बेसुमार उपसा सुरुच ठेवला आहे. वाळूचा अवैध धंदा करुन अनेकांनी आर्थिक प्रगती साधत राजकारणातही आपले पाय रोवले आहेत. त्यामुळे ज्यांनी गिरणामाईचे वस्त्रहरण करुन तिची वाईट अवस्था केली, त्यांच्यावरच ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा गिरणा काठच्या गावांमधील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. सर्वच गावांमधील ग्रामस्थांना आपली नदी बाराही महिने वाहिली पाहिजे, असे वाटते. मात्र, तिची वाईट अवस्था करणारे गावागावातील पुढारी असून त्यांच्याविषयी यानिमित्ताने सर्वसामान्य ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दहिगाव संत गावात मुक्काम
या पदयात्रेच्या तिसर्या टप्प्यात खासदार उन्मेष पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत या गावात मुक्काम केला. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावातील त्यांचा मुक्काम ग्रामस्थांसाठी कौतुकाचा विषय ठरला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकही खासदार आमच्या गावात मुक्कामाला राहिले नव्हते. खासदार उन्मेष पाटील हे पहिले खासदार आहेत, की ज्यांनी आमच्या गावात संतांच्या आश्रमात मुक्काम केला, अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला.
पायाला आले फोड मात्र पदयात्रा सुरूच
पायाला आले फोड मात्र पदयात्रा सुरूचगिरणा परिक्रमेच्या निमित्ताने खासदार उन्मेष पाटील हे दिवसाला तब्बल 25 ते 30 किलोमीटरचे अंतर पायी चालतात. त्यांच्यासोबत असलेले अनेक जण पायी चालण्याने थकतात. मात्र, उन्मेष पाटील यांच्या चेहर्यावर थकल्याचे भाव अजिबातच दिसत नाही. सलग दहा किलोमीटर पायी चालून देखील ते ग्रामस्थांनी तेवढ्याच पोटतिडकीने संवाद साधतात. यापूर्वीही बेलगंगा कारखान्याच्या विषयावर उन्मेष पाटील यांची पदयात्रा चर्चेचा विषय बनली होती. अक्षरक्षः पायाला फोड आलेले असतानाही त्यांनी पदयात्रा सुरूच ठेवली आहे. गिरणा परिक्रमेतही त्यांचे पायी चालण्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
