लग्नाहुन परततांना कार नदीत कोसळून नऊ जण जागीच ठार
जयपूर : लग्न समारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला. ही वरात चौथ का बरवाडा येथून कोटा येथे गेली होती. ते रात्री उशिरा परतत होते. या कारमधून वरासह ९ जण प्रवास करत होते. राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर हा अपघात घडला.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळाल्यावर प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमधून मृतदेह बाहेर काढले. तेव्हा घटनास्थळावर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. अपघाताचे वृत्त समजल्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातात अनेक जणांचा झालेल्या आकस्मिक मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.



