युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू : पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी युक्रेनच्या खारकीवमध्ये झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
मंगळवारी सकाळी रशियन सैन्याने खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. यादरम्यन, युक्रेनमधील खारकीव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव असून, तो अवघ्या 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता.




युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांशी चर्चा
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी फोनवर चर्चा केली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये चर्चा झाली. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी ट्विटरवर या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी संभाषणात खारकीवमध्ये रशियन हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. युक्रेनमधून भारतीय नागरीकांना बाहेर काढण्यासाठी युरोपीय देश मनापासून मदत करत आहेत.