अल्पवयीन मुले बुडत असताना वाचवण्यासाठी गेलेल्या चौघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
पालघर : अल्पवयीन मुलांना वाचवण्यासाठी समुद्रात गेलेल्या चौघांचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना केळवा बीचवर घडली. मृतांमध्ये नाशिक ₹मधील तीन तरुणांचा समावेश आहे. दोघांचे मृतदेह हाती लागले असून अन्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. केळव बीचवरील समुद्रात पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोन मुले भरतीच्या प्रवाहात बुडत असताना ही दुर्घटना घडली.
दुसऱ्याला वाचवताना तरुणांचा मृत्यू
केळवे बीच जवळील देवीचा पाडा येथील 4-5 स्थानिक अल्पवयीन मुले समुद्रात पोहायला गेली होती. त्याच वेळी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीत ही मुले बुडू लागली. त्याच दरम्यान नाशिक येथील ब्रह्मवेली नामक खाजगी कॉलेजमधील काही विद्यार्थी पोहत होते. त्यावेळी काही अल्पवयीन मुले समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्या नंतर कृष्णा शेलार, दीपक वडाकाते, ओम दिपक विसपुते, आणि अखिलेश देवरे या चार विद्यार्थ्यांनी त्या पुन्हा बुडणाऱ्या मुलाच्या दिशेने झेप घेतली. ह्यावेळी समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचविण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली.




एकाला वाचविण्यात यश
ह्यातील अखिलेश देवरे ह्याला वाचविण्यात यश आले असून स्थानिक मुलगा अथर्व नाकरे (१३, रा.देवी पाडा, केळवे) ह्याचा आणि नाशिकच्या एका विद्यार्थ्यांचा अश्या दोघांचा मृतदेह आढळला आहे. अन्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात असुन बुडालेल्या दोन्ही मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माहीमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्याची माहिती केळवे पोलिसांनी दिली. काँक्युरर अकॅडमी, अशोक स्तंभ नाशिकच्या वतीने शैक्षणिक सहल केळवा समुद्रकिनारी आज गुरुवारी सकाळी 6 वाजता खासगी ट्रॅव्हल बसने (एम.एच15 ई एफ 1515) रवाना झाली होती. बसमध्ये एकूण 39 विद्यार्थी होते.