भुसावळात उद्या प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त व्याख्यान
भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ व हिंदू जागरण मंचतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार, 8 रोजी ‘पणतीला जपताना’ या पुस्तकाचे लेखक समीर दरेकर यांचे व्याख्यान व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होणार आहे. संतोषीमाता सभागृहात दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होईल.
कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
प्रतिष्ठा महिला मंडळ व हिंदू जागरण मंचने यंदाच्या महिला दिनी महिलांना स्वयंप्रकाशाची जाणीव करून देणार्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजता संतोषीमाता सभागृहात हा कार्यक्रम होईल. ‘पणती’ फक्त प्रकाशासाठी नसते, प्रकाश तर ती स्वतः बरोबर आणतेच पण त्या प्रकाशाबरोबर मांगल्य, आनंद, परंपरा, नवचैतन्याने भारलेले वातावरण सोबत आणते. या सर्व विषयावर भाष्य करणारे, महिलांच्या अडचणी व अनेक संवेदनशील विषय योग्यरीत्या हाताळून समाजासमोर सहजपणे मांडणारे लेखक समीर दरेकर यांचे व्याख्यान होईल. यावेळी कर्तृत्ववान महिलांना ‘सन्मान स्त्रीत्वाचा’ पुरस्काराने गौरवण्यात येईल, असे अध्यक्षा रजनी सावकारे यांनी सांगितले.


