साकरीच्या तरुणाचा वडोदा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू
मामाकडे फराळ देण्यासाठी जाताना रेल्वेतून तरुण पडल्याने दुर्घटना
भुसावळ : तालुक्यातील साकरी येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा वडोदा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. सागर प्रभाकर वारके (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकूलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यूने कुटुंबियांचा टाहो मन हेलावणारा होता.
मामाकडे जाताना गाठले मृत्यूने
सागर वारके हा तरुण नाशिक येथे खाजगी कंपनीत नोकरीला असून दिवाळी सणानिमित्ताने तो साकरी गावी आला होता. बुधवारी सागरने त्याच्या गावातील मित्रांचे गेट टूगेदरही झाले तर दिवाळीच्या फराळ देण्यासाठी दुपारून तो रेल्वेनेे मलकापूर जाण्यासाठी निघाला मात्र वडोदा रेल्वे स्थानकाजवळ डुलकी लागल्याने तो रेल्वेतून पडला व जागीच ठार झाला. साकरी गावात ही बातमी धडकताच शोककळा पसरली. गुरुवारी सकाळी 10 वाजता शोकाकुल वातावरणात मृत सागरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात आई, वडील व दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.



