रावेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सानुग्रह अनुदान द्या
रावेर तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
रावेर : गेल्या काही दिवसांपासून रावेर तालुक्यात संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी शिवसेनेतर्फे गुरुवारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अतिवृष्टीचा सर्वच पिकांना फटका
निवेदनाचा आशय असा की, यावर्षी सन 2019-20 मध्ये रावेर तालुक्यात जून महिन्यापासून ऑक्टोबर महिनाअखेरीपर्यंत पर्जन्यवृष्टी अतिशय झाली असल्याकारणाने शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. रावेर तालुक्यात मुख्यत्वे केळी, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये अशी पिके घेतली जातात. सर्वच पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस पीक सडले आहे तर ज्वारी , बाजरी या पिकांचे कोंब निघायला सुरुवात झालेली आहे. केळी अतिवृष्टीमुळे पिवळी पडलेली आहे. कडधान्ये
पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहेत. कोणत्याही प्रकारचे पीक शेतकर्यांच्या हातात येऊ शकत नसल्याकारणाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सद्यपरीस्थिती बघता दिवाळीसारखा सणदेखील शेतकरी साजरा शकलेला नाही. घरामध्ये पिकच नाही, अन्नधान्य नाही यामुळे आर्थिक टंचाईत शेतकरी सापडला असून रावेर तालुक्यात आपण तत्काळ ओला दुष्काळ जाहिर करावा व सर्वेक्षण करून, पंचनामे करून तत्काळ शेतकर्यांना सानुग्रह अनुदान एकरी 20 हजार रुपये तत्काळ द्यावे जेणेकरून शेतकर्यांच्या चुली पेटतील व शेतकरी आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतील.



आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
रावेर तालुक्यात ओला दष्काळ जाहिर न केल्यास व शेतकर्यांना तत्काळ मदत न दिल्यास शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू शकते. तत्काळ रावेर तालुक्यातील शेतकर्यांना ओला दुष्काळ जाहिर करून मदत करावी अन्यथा याप्रश्नी शासनाने दखल न घेतल्यास रावेर तालुका शिवसेना पक्षातर्फे आंदोलने छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर जिल्हा उपसंघटक रवींद्र पवार, तालुका संघटक अशोक शिंदे, अशोक महाजन, युवा सेना शहरप्रमुख राकेश घोसडे, शहर उपप्रमुख गोपाल सुतार, शाखाप्रमुख चेतन कद, शहर प्रमुख कुणाल बागरे, प्रशांत धनगर, पिंटू माळी, कुणाल सुर्यवंशी, विकास शिंदे, राम शिंदे , प्रविण भोई, पंकज घोसडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
