भांडणाच्या रागातून केळीचे घड कापून सहा लाखांचे नुकसान : यावलमधील सहा संशयीतांना अटक
यावल : शेतकर्याला करण्यात आलेल्या मारहाणीनंतर उपद्रवींनी शेतकर्याच्या शेतातील दोन हजार केळी घड कापल्याने शेतकर्याचे सुमारे सहा लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीत आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली.
बकर्या चारण्यावरून निर्माण झाला होता वाद
यावल शिवारातील अट्रावल रस्त्यावल असलेल्या डॉ.दिनकर वारके यांच्या मालकीच्या शेतात किशोर देवराम राणे यांनी निम्मे हिस्स्याने शेत केले आहे. या शेतात त्यांनी केळीच्या झाडांची लागवड केली आहे. सोमवार, 14 मार्च रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातील केळीच्या दोन हजार झाडावरील घड कापून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्रकार उघड होताच खळबळ उडाली. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी शेतकरी किशोर राणे यांच्या हरभर्याच्या शेतात बकर्या चारण्यावरून वाद झाला होता. यात राणे यांना बकर्या चारणारे राजेंद्र काशिनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्निल उर्फ भुरा छगन धनगर, धनराज उर्फ बबलू राजू धनगर, एकनाथ तोताराम भिल, अनिल गंगाराम धनगर (सर्व रा.यावल) यांनी मारहाण केली होती व शेती कशी करतो? अशी धमकी दिली होती. त्यानुसार याच सहा जणांनी शेतातील पिकांचे नुकसान केल्याची तक्रार किशोर राणे यांनी यावल पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी तक्रार दिल्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.


