जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट : वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त


जळगाव (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : जळगाव शहरातील रिधुरवाडा परिसरात कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत परवानगी नसताना नागरिकांवर उपचार करणार्‍या एकाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडून वैद्यकीय व्यवसायासाठी वापरण्यात येणारे साहित्य व विविध औषधांचा साठा जप्त केला आहे. जिल्हाभरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून जिल्हा प्रशासनाने धडक तपासणी मोहिम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत सुभाष कुंभार (रा. रिधुरवाडा, घर क्रमांक 128, जळगाव) हा सुमारे दोन वर्षांपासून स्वतःच्या राहत्या घरात वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा आवश्यक परवाना किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता नसतानाही तो डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांवर उपचार करीत असल्याचा आरोप आहे.

उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे
आरोपीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना तसेच आवश्यक प्रमाणपत्र नसतानाही तो रुग्णांवर उपचार करून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे उपचार केल्याने रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असतानाही तो वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट कलम 33 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318, 319 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीकडून विविध प्रकारचे वैद्यकीय साहित्य व औषधे मिळून आली. यामध्ये बी.पी. मोजण्याचे यंत्र, स्टेथोस्कोप, थर्मामीटर, इंजेक्शनचा साठा तसेच विविध प्रकारच्या गोळ्या आदी साहित्याचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे तीन हजार 414 रुपये असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय पात्रता व अधिकृत परवानगी नसताना उपचार करणार्‍या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास पोलीस अंमलदार गणेश कुमार नायक करीत आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !