बोदवडमधील नम्र फायनान्समधील चोरीचा उलगडा : मॅनेजरसह सहा जणांना अटक
विमा क्लेम नाकारल्याने चिडलेल्या मॅनेजरने चोरट्यांच्या मदतीने आखला प्लॅन : स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची उकल
बोदवड : शहरातील नम्र फायनान्सच्या मॅनेजरने फिल्ड ऑफिसरच्या मदतीने पाच चोरट्यांकडून स्वत:च्या शाखेत 12 लाख रुपयांची चोरी केल्याची बाब उघडकीस आला असून पोलिसांनी बँक मॅनेजर, फिल्ड ऑफिसर व पाच चोरट्यांना गुरुवारी ताब्यात घेतले. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
या आरोपींना झाली अटक
अटकेतील आरोपींमध्ये मॅनेजर मनोज धर्मराज माळी (रा.बोदवड), फिल्ड ऑफिसर सुनील कडू इंगळे (30, रा.निमखेडी, ता.मुक्ताईनगर) तसेच किसन उर्फ शेंड्या कैलास सोनवणे (22), विलास मधुकर पवार (24), प्रवीण सुखा धुलकर उर्फ लहान्या, गणेश सोपान पवार (25) व प्रदीप किशोर सोनवणे (20, सर्व रा.भिलवाडा, बोदवड) यांना अटक करण्यात आली आहे. माळी हा नम्र फायनान्सचा मॅनेजर असून गतवर्षी त्याचा अपघात झाला त्यानंतर त्याने नम्र फायनान्समध्ये इन्शुरन्स क्लेम केला होता मात्र कंपनीने हा क्लेम नाकारल्याने त्याचा राग आल्यामुळे माळी याने फिल्ड ऑफिसर इंगळे याच्या मदतीने बँकेतच चोरी करण्याची योजना आखली. या दोघांनी गावातीलच भिलवाड्यात राहणार्या पाच जणांना चोरी करण्यासाठी टीप दिली. त्यानुसार 13 सप्टेबर रोजी मध्यरात्री पाचही चोरटे तोंडाला रुमाल बांधून आल्यावर त्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. नंतर बँकेत प्रवेश केला.



यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू राहोम, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, रणजीत जाधव, इद्रीस पठाण, अशोक पाटील, मुरलीधर बारी, शरद भालेराव, संदीप सावळे, गफूर तडवी, वहिदा तडवी व वैशाली महाजन यांच्या पथकाने गुरुवारी वेगवेगळ्या शहरांमधून पाच चोरट्यांसह बँक मॅनेजर माळी व फिल्ड ऑफिसर इंगळे यांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
