यावलला बाल संस्कार विद्या मंदिरात भव्य मिरवणुकीने गणरायांचे आगमन

ढोल-ताशांचा गजर, लेझीम-झांज पथकांनी वाढविली शोभा ; बालकलाकारांच्या सहभागाने यावल शहरात भक्तिमय वातावरण


यावल (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी, यावल संचलित बाल संस्कार बालवाडी, बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात यंदाचा 49 वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी आठ वाजता श्री गणरायांच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पारंपरिक वेषभूषेने वेधले लक्ष
श्री गणरायांची मिरवणूक अशोक प्रभाकर गडे यांच्या घरापासून निघून वाणी गल्ली, बारी चौक, गवत बाजार, वाचनालय मार्गे बाल संस्कार विद्या मंदिर येथे पोहोचली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी ध्वज पथक, लेझीम पथक, झांज पथक, दांडिया पथक तसेच ढोल-ताशांच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.




बालकलाकारांचे यावलकरांकडून कौतुक
भारतीय संस्कृती, परंपरा, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने गणेशोत्सवानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणरायांच्या आगमनावेळी शहरवासीयांनी बालकलाकारांचे कौतुक करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यांनी घेतले परिश्रम
गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक सुनील माळी, अतुल गर्गे, शरयू कवडीवाले, उत्सव प्रमुख संजय चौधरी, कल्याण लोंढे तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उत्सवाचे नियोजन करण्यात आले. शाळेत गणेशोत्सवाच्या पाचही दिवस विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व सर्जनशील व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !