गारखेड्याच्या शेतकर्‍याची आत्महत्या


रावेर : तालुक्यात आठवडाभरापासून तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिकांचे झालेले नुकसान सहन न झाल्याने तालुक्यातील गारखेडा येथील रेमसिंग नानसिंग बारेला (60) या आदिवासी शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नुकसानीमुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या
गारखेडा, ता.रावेर येथील रहिवासी रेमसिंग बारेला यांच्याकडे असलेल्या चार एकर शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो मात्र फारसे उत्पन्न येत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. यावर्षी त्यांनी कापूस व ज्वारीची लागवड केली असून मात्र गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या ज्वारीचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. तर कापसाचेही नुकसान झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने रेमसिंग बारेला यांना आलेल्या नैराशेतून राहत्या घरासमोर असलेल्या झोपडीत छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बारेला यांच्यावर बँकांचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत गोविंद रेमसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून येथील पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी.महाजन यांनी शवविच्छेदन केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !