पंचनाम्यांसाठी वाढीव कर्मचारी दिल्याने रस्ता रोको आंदोलन मागे


कुर्‍हे पानाचे परीसरात वेगाने पंचनाम्यांच्या कामाला सुरुवात : सोमवारअखेर 565 शेतकर्‍यांचे पंचनामे

भुसावळ : अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्यानंतर प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले खरे मात्र कुर्‍हेपानाचे येथे चक्क महसूल विभागाकडून कार्यालयात बसून पंचनाम्याचा प्रयत्न झाल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले तर या प्रकरणी कुर्‍हे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच महसूल प्रशासनाने नरमाईची भूमिका पंचनामा करणार्‍यांमध्ये वाढ केल्याने सोमवारचे रस्ता आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, सोमवारअखेर 565 शेतकर्‍यांचे पंचनामे झाले असून अद्याप 415 शेतकर्‍यांचे पंचनामे बाकी आहेत. रस्ता रोकोच्या पार्श्‍वभूमीवर तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.

वाढीव कर्मचार्‍यांमुळे आंदोलन स्थगित
सोमवारी मंडळ अधिकारी सतीश इंगळे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये तलाठी प्रवीण मेश्राम , भुसावळ (साताराचे ) तलाठी एम. एल.रत्नाची, ग्रामविकास अधिकारी पी.टी. झोपे आदींनी पंचनामे करण्यास प्रारंभ केला. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासू वराडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, किशोर वराडे, जितेंद्र नागपुरे यांच्यासह शेतकर्‍यांनी पंचनाम्यांसाठी वाढीव कर्मचारी दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका अधिकार्‍यांना कळवली.




आंदोलनाच्या मात्रेनंतर नरमले प्रशासन
ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले. जनावरांचा गुरांसाठीचा चाराही कुजला तर कपाशीच्या बोंडाला कोंब आले तर सर्वच पिके हातची गेल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला. नुकसान भरपाई मिळण्यासह पंचनामे करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना प्रशासनाने पंचनाम्याला प्रारंभ केला मात्र महसूल प्रशासनाकडून कागदोपत्र कार्यालयात पंचनामे होत असल्याची ओरड झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, उपसरपंच वासू वराडे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर वराडे, जितेंद्र नागपुरे यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी सरसकट पंचनामे करण्यात यावे व एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही या भूमिकेसाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला मात्र प्रशासनाने कर्मचार्‍यांमध्ये वाढ केल्यामुळे आंदोलकांचे समाधान झाल्याने रस्ता रोको आंदोलनाचा प्रसंग टळला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !