पाथर्डीच्या दाम्पत्याची नाथसागराच्या जलाशयात आत्महत्या
पैठण : वर्षभरापूर्वीच विवाह बंधनात अडकलेल्या पाथर्डी (जि.अहमदनगर) येथील दाम्पत्याने पैठण येथील नाथसागराच्या जलाशयात आत्महत्या केली. सोमवारी नाथसागरात सकाळी पत्नीचा तर सायंकाळी पतीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. किर्ती सचिन लवांडे व सचिन विठ्ठल लवांडे रा. पाथर्डी जि. अहमदनगर असे नाथसागरात सापडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.सोमवारी सकाळी नाथसागरात पोहण्यासाठी गेलेल्या तरूणांना 18 वर्षीय तरूणीचे प्रेत जलाशयावर तरंगत असलेले आढळून आले. सायंकाळच्या सुमारास चिंचोली, ता.घनसावंगी येथील मुलीच्या माहेरच्यांनी सदर मुलगी बद्रीबापू खोसे यांची मुलगी असल्याचे फौजदार सचिन सानप व रामकृष्ण सागडे यांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह जलाशया बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवला तर तरुणीचे नातेवाईक पैठण येथे पोहचेपर्यंत सायंकाळी सहा वाजेदरम्यान एका तरुणाचा मृतदेह तरुणी ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी फुगुन वर आल्याची खबर आली. पोलिसांनी तातडीने मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात हलवला. तेव्हा नातेवाईकांनी दोघे पती पत्नी असल्याचा खुलासा करत हंबरडा फोडला.
