मधूर संस्कार केंद्रातर्फे जामुनझिर्‍यात दिवाळी उत्साहात


यावल : शहरातील मधूर संस्कार केंद्रातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षाची आदिवासी गावची दिवाळी तालुक्यातील जामुनझिरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळी म्हटली म्हणजे बाल गोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच होय. फटाके, मिठाई, बाहेरगावी मामाच्या गावाला प्रवास अशी मजाच मजा असते. मात्र पाड्यावरील बालकांसमवेत एक दिवस दिवाळीचा आनंदोत्सव काही वेगळाच असतो. ही परंपरा येथील मधुर संस्कार केंद्राने अव्याहतपणे कायम सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे मधुर संस्कार केंद्राचे संस्थापक (कै.) पी.आर.पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या परीवाराने ही परंपरा सुरू ठेवली आहे.

जामनुझिर्‍यात साजरी झाली दिवाळी
मातृहृदयी स्व.आर.पाटील सर यांनी साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरीत होऊन लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी मधूर संस्कार केंद्राची निर्मितीची कल्पना अंमलात आणून या केंद्रामार्फत बालवयातील मुलांवर संस्कार आणि संगोपन करण्याची कार्य सुरू केले. या केंद्रामार्फत विविध उपक्रमांपैकी एक म्हणजे सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या आदिवासी वस्तीवर जाऊन दिवाळी साजरी करणे. मधूर संस्कार केंद्रातर्फे यावर्षी तालुक्यातील जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर 38वी दिवाळी साजरी करण्यात आली. गरीबीमुळे आनंदोत्सवापासून दूर असलेल्या आदिवासी मुलांना मधुर संस्कार केंद्रातर्फे एक दिवस का होईना दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करता येतो. विशेष म्हणजे या बालकांसमवेत शहरातील काही बालके समाविष्ट होऊन दिवसभर मौजमस्ती करतात. यावर्षी मधुर संस्कार केंद्राचे संस्थापक स्व.पी.आर.पाटील यांच्या पत्नी श्यामकौर पाटील, मुलगी प्रा.मधुराणी शिंदे, सुरवाडे व राधे राधे ग्रुप परीवारातर्फे तसेच निकटवर्ती सहकारी यांच्या उपस्थितीत ही आदिवासी दिवाळी साजरी करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !