ओंकार इंडस्ट्रीजच्या दूषित पाण्याने चार गावांचे पाणी दूषित


कुपनलिकांनाही फटका : इंडस्ट्रीज 20 दिवसात बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

रावेर : ओंकार इंडस्ट्रीजमधून निघणारे दूषित सांडपाणी नाल्यात सोडल्याने चार गावांच्या पाणीपुरवठ्याच्या कुपनलिकांसह परीसरातील सुमारे 35 ते 40 कुपनलिकांचे पाणी दूषित झाल्याची तक्रार निंबोल, अजंदा, विटवा व नांदूरखेडा येथील ग्रामपंचायतीसह शेतकर्‍यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे केलेली आहे. दरम्यान, या विभागाने दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले असून याबाबत आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अजंदा येथे बैठक झाली. ही इंडस्ट्रीज येथून तत्काळ बंद करावी यासाठी संबधित विभागाला शेतकर्‍यांनी 20 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा चौधरी यांनी या बैठकीत दिला.

तक्रारीनंतरही प्रदूषण महामंडळाकडून दखल नाही
या इंडस्ट्रीजने उद्योगातून निघणारे दूषित पाणी नाल्यात सोडल्याने या नाल्याच्या काठावर असलेल्या रावेर नगरपालिका तसेच अजंदा, विटावा, नांदुरखेडा व निंबोल या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या कुपनलिकांचे पाणी दूषित झाल्याची तक्रार या ग्रामपंचायतींनी केलेली आहे. तसेच या परीसरातील सुमारे 35 ते 40 शेतकर्‍यांच्या शेती सिंचनाच्या कुपनलिकांचेही पाणीही दूषित झाल्याने त्याचा परीणाम पिकांवर व शेतीवर होत आहे. याबाबत 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केलेली आहे. याला सहा महिन्याचा कालावधी उलटूनही संबधित विभागाने या उद्योगावर आतापर्यंत कुठलीही कारवाई न केल्याने शेतकरी व ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत.




बैठकीला यांची होती उपस्थिती
आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन याबाबतची व्यथा मांडली. या बैठकीस मसाका उपाध्यक्ष भागवत पाटील, अजंदा सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच प्रवीण बिरपण, पांडुरंग पाटील, अनिल दत्तू पाटील, सुरेश पाटील, पंडित पाटील, संजीव पाटील, वासुदेव पाटील, हुकूमचंद पाटील, नांदूरखेडा येथील गजानन पाटील, देविदास पाटील, सुभाष महाजन, कैलास पाटील, निम्बोलचे सतीश पाटील, अश्विन पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !