माजी गृहमंत्री देशमुखांकडून पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये पदाचा गैरवापर : बार मालकांकडील वसुलीची रक्कम शिक्षण संस्थेत वळवली
Anil Deshmukh मुंबई : पोलिस बदल्यांमध्येही पदाचा गैरवापर शिवाय मुंबईतील बार, रेस्टॉरंटकडून दरमहा 100 कोटी वसुली करण्याचे कारस्थान माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे असल्याचा गंभीर आरोप ईडीने करीत बार, रेस्टॉरंट मालकांकडून तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझेने वसूल केलेले 4.70 कोटी देशमुख यांनी हवालामार्गे नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थेत वळवले, असा ठपका ईडीने ठेवला आहे.
देशमुखांचा मुंबई न्यायालयात जामिनासाठी अर्ज
देशमुख (Anil Deshmukh) यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जामीन देण्यात यावा तसेच ईडीने दाखल केलेला खटला अपुर्या माहितीवर आधारित असल्याचे अर्जात म्हटले आहे. यावर ईडीने आक्षेप घेतला असून ईडीच्या वतीने सहायक संचालक तासिन सुलतान यांनी शपथपत्र दाखल केले. त्यात देशमुख चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप करून देशमुख वजनदार आसामी असल्याने तपासावर परिणाम होऊ शकेल, असे या मुद्द्यावर ईडीने जामिनास विरोध दर्शवला.

आज होणार एक सदस्यीय पीठापुढे सुनावणी
शुक्रवारी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसुलीच्या कटामध्ये देशमुख यांचा मुलगा हृषीकेश, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे सहभागी असून खुद्द अनिल देशमुख हेच यामागचे सूत्रधार आहेत.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण ; माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी नोंदवला जवाब
शंभर कोटींचे वसुलीचे टार्गेट : ईडी
दरमहा 100 कोटी वसुली करण्यासाठी गृहमंत्रिपदावर असताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे वाझेला आपल्या शासकीय निवासस्थान ‘ज्ञानेश्वरी’ येथे वारंवार बोलावत. तसेच इतर कनिष्ठ अधिकार्यांनाही पैशाच्या अवैध व्यवहारासाठी शासकीय निवासस्थानी बोलावत होते, असा दावा ईडीने केला आहे. बारमालकांकडून वाझेने गोळा केलेले 4 कोटी 70 लाख रुपये देशमुख कुटुंबीयांच्या मालकीच्या नागपूर येथील साई शिक्षण संस्थेत हवालामार्गे वळवण्यात आले. सन 2011 पासून देणग्यांच्या नावाखाली या संस्थेमध्ये 13.25 कोटींची बेहिशेबी रक्कम वळवण्यात आली. रोख रकमेच्या भागभांडवलामध्ये रूपांतर करून बोगस कंपन्यांमार्फत देशमुख यांनी प्रचंड मोठे उद्योग साम्राज्य उभे केले असा ठपका ईडीने ठेवला आहे.
पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये पदाचा गैरवापर
कॅबिनेट मंत्र्यांच्या सल्लामसलतीने बदल्यांची अनधिकृत यादी पोलिस दलातील बदल्यांमध्ये देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा गैरवापर केला. एक कॅबिनेट मंत्री आणि देशमुख हे आपल्या मर्जीप्रमाणे पोलिस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांची यादी तयार करीत. त्याची कुठेही अधिकृत नोंद ठेवली जात नव्हती. तीच अनधिकृत यादी तत्कालीन अतिरिक्त गृहसचिव सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवली होती. बदल्यांची अनधिकृत यादी तयार केली जात होती याची कबुलीही देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिल्याचे ईडीच्या शपथपत्रामध्ये म्हटले आहे.