‘प्ले बॉय’ होण्याच्या नादात तरुणाने गमावले 17 लाख


पुणे : ‘प्ले बॉय’ होण्याच्या नादात मूळ सोलापूरच्या एका तरुणाने दिवंगत वडिलांच्या सेवानिवृत्तीचे तब्बल 17 लाख 38 हजार रुपये ऑनलाइन गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी दयाशंकर मिश्रा, रागिणी (पूर्ण नाव माहिती नाही), विक्रम सिंग या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसरात राहणार्‍या एका उच्चशिक्षित पदवीधर तरुणाने प्ले बॉय होऊन दररोज तीन हजार रुपये कमवा, अशी जाहिरात सोशल मीडियावर पाहिली. त्यानुसार त्याने कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी केली. यानंतर लायसन्स फी, रूम भाडे, पोलिस व्हेरिफिकेशन, पिकअप ड्रॉप, लेट फी, पॉलिसीची रक्कम व त्याचे विलंब शुल्क अशी विविध कारणे सांगत या तरुणाकडून ऑनलाइन 17 लाख रुपये घेण्यात आले.



वडिलांच्या सेवानिवृत्तीची रक्कम भामट्यांनी हडपली
विशेष म्हणजे तरुणाने बँकेतून निवृत्त झालेल्या दिवंगत वडिलांच्या सेवानिवृत्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने या खात्यात भरली. त्यासाठी त्याने घरी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. तब्बल 17 लाख 38 हजार 882 रुपयांची रक्कम भरल्यावर तरुणाने कामाचे काय झाले याची विचारणा संबंधितांना केली. मात्र, त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली असून तपास सुरू आहे.

माजी गृहमंत्री देशमुखांकडून पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये पदाचा गैरवापर : बार मालकांकडील वसुलीची रक्कम शिक्षण संस्थेत वळवली


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !