भांडी घासण्यास सांगितल्याच्या रागातून मित्राचा केला खून
पुणे : भांडी घासण्यास सांगितल्याने मित्राने खोलीवरील मित्राचा छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना पुण्यातील बाणेर येथे शनिवारी उघडकीस आली. अमर बसंत मोहापात्रा (28, प्रथम ब्लिस सोसायटी, बाणेर, मूळ ओडिशा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी अनिलकुमार सरतकुमार दास (21) याला अटक केली. या प्रकरणी बिरजू भुवनेश्वर साहू याने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मित्राच्या छातीत चाकू खुपसल्याने जागीच मृत्यू
ओडिशाचे तिघे कामगार एका सलूनमध्ये काम करतात. तिघेही बाणेरमधील प्रथम ब्लिस सोसायटीत राहत होते. घरीच ते स्वयंपाक करत असत. कामावरून रात्री घरी आल्यावर अमर याने सकाळची राहिलेली भांडी घासण्यास अनिलकुमार याला सांगितले होते. त्यामुळे त्याने तू मुझे बरतन धोने के लिए बोलता है क्या, तुझे आज खल्लास करता हूं,’ असे म्हणून त्याने स्वयंपाकघरातील भाजी चिरण्याचा चाकू घेऊन अमर याच्या छातीत खुपसला. यात त्याचा मृत्यू झाला.
