रस्त्यांच्या निकृष्ट कामानंतरही दोषींवर कारवाई नाही
भुसावळातील नितीन नंदवणे यांची राज्य शासनाकडे तक्रार
भुसावळ- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागात येणार्या भुसावळातील नाहाटा चौफुली ते चोरवड, यावल नाका ते आमोदा, सावदा ते रावेर या रस्त्यांच्या कामांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. या संदर्भात शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन नंदवणे यांनी दृश्य पुराव्यांसह तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या प्रकरणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर आता कार्यासन अधिकारी एस.डी.पाष्टे यांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुराव्यानंतरही कारवाईला बगल
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन नंदवणे यांनी पुराव्यांसह, निकृष्ट कामांची माहिती फोटो व चित्रिकरण उत्तर विभागाकडे दिले आहे मात्र यानंतर कोणत्याही स्वरुपाची कारवाई झाली नाही. शहरातील प्रेरणानगर, तुकारामनगर, माऊलीनगर, स्वामी नारायण मंदिर परीसर, अमरनाथ नगर, आरएमएस कॉलनीत डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आहे. यामुळे रस्ते अल्पावधीत खिळखिळे झाले आहेत. या संदर्भातील तक्रारी उत्तर विभाग व अन्य जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी नितीन नंदवणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयात तक्रार केल्यानंतर कार्यासन अधिकारी सु.दि.पाष्टे यांनी अधीक्षक अभियंता (जळगाव) यांना वस्तूस्थितीदर्शक अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता या रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारांवर उत्तर विभागाकडून काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नंदवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा अंदाधुंद कारभाराला वाचा फोडल्याने अधिकार्यांमध्येही खळबळ उडाली आहे.



