धुळ्याच्या महिलेच्या बॅगेतून 33 ग्रॅम सोन्यावर चोरट्यांचा डल्ला : जळगावातील नवीन बसस्थानकातील प्रकार
जळगाव (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) :धुळ्यातील महिला जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे व्याहींकडे आल्यानंतर परतीच्या प्रवासात धुळे जात असताना बसमध्ये चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या बॅगेतून 33 ग्रॅमचे दागिने लांबवले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण?
धुळ्यातील शिवाजी नगरातील प्रभावती पंडीतराव विसपुते (60) या कुसूंबा येथे व्याह्यांकडे आल्या होत्या. 12 सप्टेंबर रोजी धुळे येथे परत जाण्याकरीता त्या नवीन बसस्थानकात आल्या व सायंकाळच्या सुमारास त्या धुळे जाण्याकरीता बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रभावती विसपुते यांच्या बॅगेतून 28 ग्रॅमची सोन्याची माळ व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 90 हजार रुपयांचा ऐवज लांबवला.



बॅग उघडी दिसताच बसला धक्का
बसमध्ये चढल्यानंतर प्रभावती विसपुते यांना बॅग उघडी दिसल्यामुळे त्यांनी लागलीच बॅगेत ठेवलेले दागिने तपासले. यावेळी त्यांना बॅगेतून दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. दरम्यान, महिलेने तात्काळ जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश शिरसाळे हे करीत आहे.
पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध
नवीन बस स्थानकातून वृद्ध महिलेचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी नवीन बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
