रेल्वे लाईन भूसंपादनासाठी स्क्वेअर फुटाप्रमाणे पाच पट मोबदल्याचे आश्वासन आता घूमजाव : भुसावळात शेतकरी संतप्त


भुसावळ : रेल्वेच्या तिसर्‍या आणि चौथ्या लाईनसाठी जमिनीचा ताबा घेवून काम पूर्ण करण्यात आले मात्र शेतकर्‍यांना जमिनीच्या मोबदल्यात दमडीही मिळाली नाही. भूसंपादन कायद्यानुसार प्रांताधिकार्‍यांकडून स्क्वेअर फुटाप्रमाणे पाच पट रक्कम मिळेल, असे आश्वासन मिळाले होते मात्र त्याची पूर्तता होत नसल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

पाच पट रक्कमेचे तोंडी आश्वासन
रेल्वेच्या अप तिसर्‍या व चौथ्या लाइनच्या कामासाठी शहरातील रेल्वे ब्रीज ते साकेगावदरम्यान असलेली शेती तसेच एनए प्लॉट चार वर्षांपूर्वी संपादीत करण्यात आले होते. प्रांताधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना भूसंपादन कायद्यानुसार पाच पट रक्कम मिळण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत एकरप्रमाणे रक्कम देण्याचे सांगितले गेले. यामुळे प्लॉटधारक व शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भूसंपादन कायद्यानुसार स्क्वेअर फुटाप्रमाणे आजच्या बाजारमूल्याच्या पाचपट रक्कम मिळावी, अशी मागणी केली. याबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.


तर तीव्र आंदोलनाचा इशारा
शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता न केल्यास भूसंपादन झालेले शेतकरी व प्लॉटधारक प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला. यावेळी दिलीप कोल्हे, सुहास फालक, संजय कोलते, किशोर पाटील, सतीश बोंडे, राजेंद्र पाटील, अनिल अत्तरदे, राजन फालक, अमोल फालक, पांडुरंग कोलते, नामदेव सोनवणे, पवन सोनवणे, अमोल फालक, रवींद्र पाटील, प्रकाश फालक असे 30 ते 35 शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, शेतकर्‍यांच्या या भूमिकेनंतर आता प्रशासन काय उत्तर देते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !