भुसावळातील जखमी विद्यार्थ्यांचा अखेर मृत्यू


भुसावळ- आशिया महामार्ग क्रमांक 46 वरील पूजा कॉम्प्लेक्स जवळ 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातातानंतर मृत्यूशी झुंज देणार्‍या विद्यार्थ्याचा मंगळवारी अखेर मृत्यू ओढवला. वैभव प्रवीण कासार (19, चौथे) असे मृत तरुणाचे नाव आहे. जामनेर रस्त्यावरील साईबाबा मंदिर समोरील सोमनाथ नगरातील रहिवासी व फैजपूर येथील जे.टी.महाजन इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी वैभव प्रवीण कासार हा 8 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील खंडाळा-मोंढाळा येथे आपल्या मित्रांसह फिरायला गेला. परतीच्या प्रवासात दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घराकडे येत असताना रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात वैभव कासार हा गंभीर जखमी झाला होता. या अपघातात वैभवचचा मित्रही जखमी झाला होता. दरम्यान, गंभीर अवस्थेत वैभवला सामाजिक कार्यकर्ते सतीश घुले, राजेश(मंत्री) चौधरी, प्रभाकर रणदिवे, दीपक मावळे व त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सुमारे चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी वैभवचा मृत्यू झाला. घरातील एकुलता मुलगा गेल्याने परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील प्रवीण कासार हे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात विद्युत साहित्य विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करतात तर आई घरात किराणा दुकान चालवते. मृत वैभवच्या पश्चात आई,वडील, आजी, आजोबा व बहिण असा परीवार आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात मंगळवारी सायंकाळी वैभववर अंत्यसंस्कार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !