चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणार्या पतीला आजन्म कारावास
जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल : साक्ष ठरली महत्त्वाची
जळगाव : पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेणार्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला चढवून तिचा खून केला होता. मालखेडा, ता.जामनेर येथे मार्च 2018 मध्ये ही घटना घडली होती. या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयात चालले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून जिल्हा न्यायालयाने आरोपी लदळ्या आसाराम पावरा (रा.शेमोखुट, ता.झेरल्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
फैजपूर मंडळाधिकार्यांच्या वाहनाला डंपरने उडवण्याचा प्रयत्न
साक्ष ठरली महत्त्वाची
मध्यप्रदेशातील लदळ्या आसाराम पावरा यांचा विवाह जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे राहणार्या फुनाबाई दगडू बारेला यांच्याशी झाला होता. लदळ्या हा पत्नी फुनबाई यांच्या चारीत्र्याचा संशय घेवून नेहमीच शिविगाळ व मारहाण करीत होता. मार्च 2018 मध्ये होळीच्या निमित्ताने फुनाबाई ही मालखेडा या आई जिलाबाई व वडील दगडू बारेला यांच्याकडे आल्या असता 8 मार्च 2018 रोजी लदळ्या हा पत्नीला घेण्यासाठी मालखेडा येथे आला होता. रात्री जेवण करून सर्व कुटुंबिय झोपलेले असतांना लदळ्या याने हातात चाकू घेवून पत्नी फुनाबाई हिच्यावर सपासप वार केल्याने पत्नीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शेंदुर्णी दुरक्षेत्र अंतर्गत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयीत म्हणून लदळ्या याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, संशयीत आरोपीवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायालयाचे न्या.ए.के. लाहोटी यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. यात 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात मयत फुनाबाईची आई, वडील आणि प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्वाची ठरली.


आजन्म कारावास व पाच हजार दंड
आरोपी लदळ्या याला पत्नीच्या खुनप्रकरणी दोषी ठरवत कलम 302 अन्यये आजन्म कारावासाची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता निलेश चौधरी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी संजय गोसावी यांनी सहकार्य केले.