हज यात्रेसाठी आता 5 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार


यावल : मुस्लिम धर्मात पवित्र समजल्या जाणार्‍या हज यात्रा 2020 साठी या वर्षी प्रथमच डिजीटल पद्धतीचा अवलंब केला गेला. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून आता येत्या 5 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे तर यापूर्वी ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत होती. 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या महिनाभरात ऑनलाईन पध्दतीने निश्चीत केलेल्या कोट्यापेक्षाही कमी अर्ज दाखल झाल्यामुळे ही मुदतवाढ करण्यात आली आहे.

अ‍ॅपवरूनही दाखल करता येणार अर्ज
हजयात्रा 2020 साठी शंभर टक्के ऑनलाईन, डिजीटल आहे. सर्व भविकांसाठी ई- व्हिसा देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मोबाईल अ‍ॅपवरुन सुद्धा भाविक अर्ज दाखल करू शकणार आहेत. हज कमेटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मक्सूद अहमद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात हज कमेटीकडे संपूर्ण भारतात एक लाख 34 हजार भाविकांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल झाले आहेत. आणि भारतीय भाविकांच्या कोट्यात वाढ झाल्याने हा कोटा हज कमेटीचा एक लाख 40 हजार करण्यात आला आहे. या निश्चित कोट्यापेक्षाही सहा हजार अर्ज कमी आले आहेत. गेल्या वर्षी मुदतीपर्यंत दोन लाख 60 हजार भाविकांचे अर्ज दाखल झाले होते. वेगवेगळ्या राज्यातून अर्ज दाखल करण्याच्या तारखेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार येत्या 5 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीमुळे मुंबई, ठाणे, संपूर्ण भारतातील भाविकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.



22 ठिकाणावरून हजला जाता येणार
महाराष्ट्रासह हजयात्रा 2019 साठी संपूर्ण भारतातून 21 ठिकाणाहून हजयात्रेसाठी जाण्याची व्यवस्था होती. आता 2020 साठी त्यात विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून नवीन व्यवस्था करण्यात आल्यामुळे यापुढे आता एकूण 22 ठिकाणांहून हजयात्रेस जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हजयात्रा 2020 साठी मुंबई येथील हज हाऊस मध्ये एक माहिती, मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र हज यात्रा प्रक्रियांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !