मुक्ताईनगरातील खड्ड्यांची आमदार चंद्रकांत पाटलांकडून पाहणी
मुक्ताईनगर : शहरातील प्रवर्तन चौक व शाहू-फुले-आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यासमोर तसेच बस आगारासमोर पाईपलाईनच्या गळतीमुळे वारंवार पडणार्या खड्ड्यांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून अधिकार्यांची झाडाझडती घेतली. अतिशय गचाळ पद्धत्तीने काम करणार्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग टोलवा-टोलवीने वाहन धारकांना मोठा मनस्ताप या खड्ड्यांमुळे सोसावा लागत असल्याने संताप व्यक्त होत होता.
जीर्ण पाईप लाईनची डोकेदुखी
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातून 42 गावांची पाणीपुरवठा योजनेची (तळवेल पॅकेट) पाईपलाईन गेलेली आहे. ही योजना 1995 पासून ते 2006 ला एक्सपायर झालेली असून त्यामुळे ही पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही पाईपलाईन अनेकदा फुटत असल्याने जोडणी करण्यासाठी वेळोवेळी खोदकाम होवून चौकापासून ते एस.टी. आगारापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधीत दोन्ही विभागाच्या अधिकार्यांची झाडाझडती घेतली. सविस्तर चर्चा करीत संबंधीत योजनेसंबंधी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुचना केल्या. लवकरात-लवकर पाईपलाईनचे काम मार्गी लावून प्रवर्तन चौकापासून ते एस.टी.आगारापर्यंत सिमेंट रोडचे काम मार्गी लावणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.



यांची होती उपस्थिती
संबंधीत अधिकारी यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्राम गृहात चर्चा केली. यावेळी संबंधीत विभागाचे अभियंते विश्वे व तायडे उपस्थित होते तर चर्चेनंतर प्रवर्तन चौकात जावून रस्त्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी अॅड.मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, सुनील पाटील, दीपक पवार, प्रशांत टोंगे, राजेंद्र तळेले, संतोष कोळी उपस्थित होते.
