CM Uddhav Thackeray औरंगाबाद नामांतरावरून उद्धव ठाकरे संतापले : नाव बदलायला आता बदलू शकतो, पण…!
औरंगाबाद : संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हे तर सत्ता गेल्यामुळे शहरात आक्रोश काढण्यात आला. तुमची सत्ता असताना पाणी योजनेला का निधी दिला नाही. खोटे बोलणं हे आमच्या हिंदुत्वात नाही. रस्त्यासाठी निधी दिला आहे. ३-४ वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते आणि आज पाहा. रस्ते सुधारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाले. पर्यटनासाठी जंगलसफारी होतेय. मेट्रोसाठी प्लॅन बनवण्याची सुरुवात झाली आहे. विद्रुपीकरण करणारी मेट्रो नसेल. विध्वंसक विकासकामे आमच्याकडून होणार नाही. शहराची शान वाढवणारी विकासकामे होतील हे वचन मी तुम्हाला देतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितले.
अभिमान वाटेल असे शहर उभे करणार
उद्धव ठाकरे म्हणाले की, या शहराचे नुसते नामातंर करणार नाही तेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना अभिमान वाटेल असं शहर उभं करेन, असं वचन देतो. नाव बदलायला काय आता बदलेल पण तुम्हाला रस्त्यावर खड्डे दिले, नामांतर केलं, पाणी नाही दिलं, नाव बदल आणि रोजगार नाही दिला असे कसं चालेल. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि संभाजीनगरच्या नामांत्तरावर स्पष्ट बोलले.
वचनपूर्ती निश्चित करणार
संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिला.







