भुसावळातील सेवेकर्‍याची भंगार चोरट्यांकडून हत्या : तीन आरोपींना शहर पोलिसांकडून अटक

हटकल्याच्या वादातून खून : शहर पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्याची अखेर उकल


Bhusawal volunteer murdered by scrap thieves ; City Police arrest three accused भुसावळ (1 जुलै 2026) : शहरातील आरपीडी रोडवरील मिलिटरी डेपोमागील कालिका मंदिराची स्वच्छता करणार्‍या 55 वर्षीय सेवेकर्‍याची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी मारहाण करीत हत्या केली होती. ही घटना सोमवार, 29 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. कुणाशीही वैर नसलेल्या संतोष रघुवीर मनचल (55, झेडटीआरआय परिसर, भुसावळ) यांची हत्या कुणी? यावरून संशय निर्माण झाला असतानाच शहर पोलिसांनी 48 तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भंगार चोरट्यांना हटकल्याच्या वादातून हत्येचा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ने यापूर्वीच खून नशेखोर व भंगार चोरट्यांबाबत संशय व्यक्त केला होता व हा संशय खरा ठरला आहे.

या आरोपींना अटक
क्षितीज संजय भालेराव (झेडटीसी, भुसावळ), प्रफुल उत्तम जाधव (रा. कोळीवाडा, जुना सातारा, भुसावळ) व हर्षल राजू वर्मा (झेडटीसी, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.



मंदिराची देखभाल करीत गुजराण
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळातील लष्करी डेपोमागील भागात डाऊन रेल्वे लाईनजवळ भगवान शंकर व कालिका मातेचे मंदिर आहे. या मंदिराची देखभाल व स्वच्छता करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून संतोष मनचल करीत होते. मंचल हे उत्कृष्ट चारचाकी वाहन दुरुस्ती करणारे गॅरेज व्यावसायीक होते मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांनी गॅरेज व्यवसाय सोडत मंदिराची सेवा स्वीकारली. मंदिरापासून जवळच असलेल्या झेडआरटीआय भागात मंचल यांची पत्नी मंजू व मोठा मुलगा रवी व लहान मुलगा आकाश, चार मुली वास्तव्यास आहेत. मंचल मंदिरात राहत असलेतरी कुटूंबाकडून त्यांना दोन वेळचा जेवणाचा डबा आणून देत होते.

उशिराने उघडकीस आली खुनाची घटना
कालिका माता मंदिर परिसरातून रेल्वे कर्मचार्‍यांचे जाणे-येणे असून सोमवारी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या दरम्यान कर्मचार्‍यांना मंचल हे रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसताच त्यांच्या कुटूंबाला माहिती कळवण्यात आली व मोठा मुलगा रवी मंचल याने धाव घेत पाहणी केल्यानंतर खुनाचा प्रकार समोर आला. शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली.

भंगार चोरट्यांशी वादातून झाला खून
रविवार, 28 जूनच्या मध्यरात्री भुसावळच्या झेडटीसी भागातील संशयीत रेल्वेचे भंगार चोरीच्या उद्देशाने या परिसरात आल्यानंतर त्यांना मनचल यांनी हटकल्यानंतर आरोपींनी वाद घातला व शिविगाळ करीत त्यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीत मनचल यांचा जबडा तुटला तर छातीच्या बरगड्याही तुटल्याने ते जागीच गतप्राण झाले. आरोपींनी खुनानंतर घटनास्थळावरून पलायन केले. शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात शहर डीबी पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !