भुसावळात पाणीप्रश्न बिकट : माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंकडून अधिकारी फैलावर
पाणीपुरवठा विभागाच्या अनास्थेवर ओढले ताशेरे : पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी
Water crisis worsens in Bhusawal ; former Municipal Council President Umesh Nemade slams officials भुसावळ (1 जुलै 2026) : शहरातील पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनास्थेमुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही टंचाईच्या झळा जाणवत आहेत. पाणीप्रश्न पेटला असतानाच भुसावळचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मंगळवारी पालिका गाठत अधिकार्यांना फैलावर घेतले.
पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह
उमेश नेमाडे म्हणाले की, भुसावळ शहराच्या इतिहासात प्रथमच अशी वेळ आली आहे की जॅकवेलजवळ पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहिला नाही, आणि तरीही नगरपालिका प्रशासन निवांत बसले. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर लाखो नागरिकांच्या मूलभूत हक्काशी केलेला गंभीर अन्याय आहे. बंधार्यातील पाणी संपेपर्यंत संबंधित अधिकार्यांनी काय केले व वा परिस्थितीचे पूर्वनियोजन का केले नाही? शिवाय नागरिक पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण फिरत असून पैसे देऊनही पाण्याचे टँकर मिळत नाही, अशी स्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीत एकही जबाबदार अधिकारी समोर येऊन नागरिकांना सत्य परिस्थिती सांगत नाही. नेमका अडथळा काय आहे? तो कधी दूर होणार? याची माहिती का दिली जात नाही? असा प्रश्न त्यांनी केला.


पाण्याचे वेळापत्रक जाहीर करा
नेमाडे म्हणाले की, पालिकेच्या बंधार्यात आणल्याने आता कोणत्या भागात, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी पाणी सोडले जाणार ? याचे वेळापत्रक जाहीर करावे व नागरिकांना याची कल्पना द्यावी. लोक रात्री-अपरात्री जागरण करून नळाला पाणी आले का हे पाहत आहेत. पालापाचोळ्यासारखे नागरिकांना वेठीस धरणे थांबवावे व नियोजनशून्य पाणीपुरवठा करून प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी आणि मानसिक शांततेशी खेळत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
मग साथीचे आजार पसरल्यानंतर जागे होणार का?
शहरवासीयांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेले अॅलमही टाकले जात नाही मग नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? एखादा साथीचा रोग पसरल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न नेमाडे यांनी उपस्थित करीत पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर वर्षभरापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्या खर्चाचे नेमके फलित काय? त्या कामाची चौकशी होणार का? असा सवालही त्यांनी केला.
आता भुसावळकर सहन करणार नाही !
भुसावळकरांनी कर भरायचा मात्र पाण्यासाठी रात्रभर जागायचे? हे आम्ही सहन करणार नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत झाला असून आता प्रशासनाला उत्तर द्यावेच लागेल, असेही नेमाडे यावेळी म्हणाले.
