चोपडा आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात
जातीच्या दाव्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली
औरंगाबाद : चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांच्या जातीच्या दावा संबंधीची दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.डी. धनुका व न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी रद्दबातल ठरवली आहे. चार आठवड्यांसाठी आमदार सोनवणे यांच्यावर खंडपीठाच्या आदेशाच्या अनुषंगाने कुठलीही फौजदारी कारवाई करण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी उमेदवाराने घेतला आक्षेप
लता सोनवणे या अनुसूचित जमातीमधील टोकरे कोळी या जातीच्या प्रमाणपत्रावर चोपडा मतदार संघातून निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या जातीच्या दाव्यासंबंंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आक्षेप घेत नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.
खंडपीठाने फेटाळली याचिका
डिसेंबर 2021 मध्ये जात प्रमाणपत्र तपासणी समितीने संबंधित दावा अवैध ठरवला होता. समितीच्या या निर्णयाविरुद्ध आमदार लता सोनवणे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले होते. नंदुरबार तपासणी समितीचा निर्णय रद्द करून अनुसूचित जमातीमधील टोकरे कोळी हे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात यावे, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली होती. प्रतिवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार वळवी यांनी सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी केली होती. वळवी यांच्यावतीने अॅड.योगेश बोलकर यांच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी बाजू मांडली तर याचिकाकर्त्या सोनवणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर.एन.धोर्डे यांनी काम पाहिले.







