महात्मा फुले यांच्या शैक्षणिक विचारांनीच क्रांती
प्राचार्य डॉ.वासुदेव वले : शहिद भगतसिंग फाऊंडेशनतर्फे निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
भुसावळ : शिक्षण हे मन, मनगट व मेंदू बळकट करणारे असून शिक्षणातून माणसाला खरे-खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे. तो वैचारीक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अंगाने डोळस झाला पाहिजे .माणसाचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद शिक्षणात आहे, हे महात्मा फुले यांनी जाणले होते त्यासाठी त्यांनी शिक्षण सर्वांना खुले करण्याची मागणी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे केली होती. स्वतः यात लक्ष्य घालून त्यांनी या देशातील बहुजन वर्गासाठी 1848 ला या देशातील बहुजनांसाठीची पहिली शाळा पुण्यात काढून बहुजनांच्या दारात शिक्षण आणले. त्यांच्या शैक्षणिक विचारांनीच समाज व राष्ट्रात सर्वंकष क्रांती करणे शक्य आहे, असे मत प्राचार्य डॉ.वासुदेव वले यांनी मांडले. ते शहिद भगतसिंग फाऊंडेशन, भुसावळ या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष पदावरून बोलत होते.
यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.वर्षा नेहेते, प्रा.डॉ.दिनेश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथ अप्पा सोनवणे, प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, प्रागतिक मंचचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे, नॉलेज सेंटरच्या वंशिका खोब्रागडे, पत्रकार संजयसिंग चव्हाण, प्रागतिक मंचचे सचिव प्रशांत तायडे आदी उपस्थित होते.

महात्मा फुले यांचे कार्य क्रांतिकारकच
प्राचार्य वले म्हणाले की, बलशाली राष्ट्र ही संकल्पना केवळ आणि केवळ शिक्षणामधूनच साकार होईल. हे लक्षात घेऊनच महात्मा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात शिक्षण सर्वांसाठी खुले केले. बहुजनांच्या जीवनात शिक्षण आणणारे महात्मा फुले यांचे कार्य क्रांतिकारक आहे. ज्ञान -विज्ञान, श्रम-संस्कार, विचार-आचार यांना डोळस व वैचारीक अंगाने समवृद्ध करणारे शिक्षण महात्मा फुले यांना अपेक्षित होते. वर्तमानात आमच्या शिक्षण विचारवंतांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व विचार समजावून घेऊन ते विचार नव्या शिक्षण पद्धतीत आणल्याशिवाय सर्वांगाने सक्षम समाज व राष्ट्र आपण निर्माण करू शकणार नाही.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी रघुनाथअप्पा सोनवणे, प्राचार्य वर्षा नेहेते, प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, संजयसिंग चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त करून विजेत्या व सहभागी स्पर्धकांना डोळस व वैचारिक समवृद्ध होण्यासाठी अक्षर वाचन-लेखनासाठी शुभेच्छा देऊन वाचन -लेखनावर भर देण्याचे आवाहन केले. खुल्या, कनिष्ठ महाविद्यालय, व माध्यमिक गटातील 28 विजेत्या स्पर्धकांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक शहिद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे यांनी तर सूत्रसंचालन विनोद बार्हे यांनी तसेच आभार देवेंद्र तायडे यांनी मांडले. यशस्वीतेसाठी प्रा.जतीन मेढे, समाधान जाधव, देवेंद्र तायडे, सुशील रायपुरे, भुपेंद्र तायडे आदींनी परीश्रम घेतले.