अट्टल दुचाकी चोरटा ‘दयावान’ जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
27 दुचाकी चोरीची कबुली : चोरीच्या नऊ दुचाकी केल्या जप्त
जळगाव : अल्प किंमतीत चोरीच्या दुचाकी विक्री करणारा अट्टल दुचाकी चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असून त्याने आतापर्यंत 27 दुचाकी चोरल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून नऊ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून अन्य दुचाकी जप्त करण्यासाठी पथके पुण्यासह अन्य भागात पोहोचली आहेत. वैभव उर्फ दयावान देविदास बैरागी (26, रा.कुंझर, ता. चाळीसगाव ह.मु. कुंभारवाडा, पिंप्राळा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
14 गुन्हयात आरोपी मोस्ट वॉण्टेड
दयावान हा धुळे जिल्ह्यातील 14 गुन्ह्यात मोस्ट वॉँटेड आहे. एका गुन्ह्यात त्याचा साथीदार पकडला गेला होता, मात्र हा तेव्हा निसटला होता. जळगाव जिल्ह्यात जिल्हा पेठ, एरंडोल, जळगाव शहर, रामानंद नगरसह औरंगाबाद येथेही त्याने दुचाकी चोरी केल्या आहेत, तशी कबुली त्याने दिली. दुचाकी विक्री करताना 5 ते 10 हजार रुपये घेऊन कागदपत्रे नंतर आणून देतो अशी बतावणी तो करीत असे. दरम्यान, सर्वच दुचाकींना बनावट क्रमांक टाकून त्याची विक्री तो करीत असे. शहरातील 13 गुन्ह्यांमध्ये त्याचा थेट सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, शरद भालेराव, विनोद पाटील, अनिल देशमुख, रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी, राहूल पाटील व परेश महाजन या पथकाने ही कामगिरी बजावली. आरोपी कुंझर, ता.चाळीसगाव येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याला घरातूनच ताब्यात घेण्यात आले.



