विवर्याच्या शेतकर्याने मृत्यूला कवटाळले
रावेर : तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील शेतकरी सुभाष नारायण सरोदे (55) यांनी रविवारी पहाटे,घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे कर्जफेडीची चिंता असल्याने त्यांनी जीवनयात्रा संपवली. सरोदे यांच्याकडे दीड एकर शेती आहे. त्यावर त्यांनी कपाशी लावली होती. त्यांनी विवरे बुद्रूक विविध कार्यकारी सोसायटीकडून 25 हजार रुपये पीक कर्ज, तसेच एक लाख रुपये उसनवारीने घेतल्याचे कुटुंबियांनी सांगितले मात्र अवकाळी पावसामुळे कपाशीचे उत्पन्न कमी झाल्याने त्यांना कर्जफेडीची चिंता सतावत होती. याच विवंचनेतून त्यांनी रविवारी पहाटे गळफास घेतला. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
