भुसावळातील तक्रारदाराला अश्लील व्हिडिओ पाठवून लुटले : आरोपीला हरीयाणातून अटक
Bhusawal complainant robbed by sending pornographic videos: Accused arrested from Haryana जळगाव : भुसावळातील एकाची सोशल मिडीयाद्वारे ओळख निर्माण करून अश्लील व्हिडिओ पाठवून 10 हजार 580 रुपये लाटण्यात आले. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला हरीयाणा राज्यातून अटक करण्यात आली. मुरसलिम आशू मोहम्मद (रा.गागडबास मेवात, हरीयाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सायबर पोलिसात दाखल होता गुन्हा
तक्रारदार हे भुसावळ शहरातील रहिवासी असून 18 एप्रिल रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांच्या व्हॉटसअॅप नंबरवर संशयिताने स्त्री असल्याचे भासवून तक्रारदार यांच्याशी चॅटींग केली. त्यानंतर संशयिताने तक्रारदार यांच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठविला. त्यानंतर तक्रारदार यांचे काही फोटो घेवून स्त्री सोबत व्हिडीओ बनविला आणि सोशल मिडीयात व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी घाबरून दिलेल्या बँक अकाऊंटवर 10 हजार 580 रुपये पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी 19 एप्रिल रोजी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हरीयाणातून आवळल्या मुसक्या
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासात संशयित आरोपी हा हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद जाधव, ललित नारखडे, संदीप नन्नवरे यांनी संशयिीत आरोपी मुरसलिम आशू मोहम्मद (गागडबास मेवात, हरीयाणा) याला हरियानातून शुक्रवार, 8 जुलै रोजी अटक केली. आरोपीकडून न गुन्ह्यातील 10 हजार 580 रूपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.