20 लाखांची खंडणी भोवली : यावल शहरातून दोघे पोलिसांच्या जाळ्यात

सिनेस्टाईल पकडले : जळगाव तालुका पोलिसांनची कारवाई


जळगाव : अंगणात उभी असलेली वाहने पेटवून चिठ्ठीद्वारे खंडणी मागणाऱ्या दोन भामट्यांना जळगाव तालुका पोलिसांनी यावलच्या बस स्थानकातून सिनेस्टाईल पाठलाग करत आज अटक केली. निमखेडी शिवारातील साईविहार कॉलनीत २९ जून रोजी मध्यरात्री अंगणात लावलेल्या दोन कार पेटवून देत आरोपींनी सुरुवातीला १० लाखांची खंडणी मागितली व नंतर रकमेत वाढ होऊन ती तब्बल 20 लाखांपर्यंत पोहोचली होती. सुरेश रमेश लहासे (रा. पहूर, ता. जामनेर) व राजू समाधान कोळी (रा. गोदरी, ता.जामनेर )अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

जाळपोळ करणाऱ्यांनी चिठ्ठी लिहित मागितली खंडणी
याबाबत अधिक माहिती अशी की, निमखेडी शिवारातील साई विहार येथील रहिवाशी हरीश वरूडकर यांची कार क्रमांक (एम.एच. २० डी.जे.७३१६) व आनंद युवराज पाटील यांची कार क्रमांक (एम.एच.१९ सी.झेड. ४४३०) या दोघांच्या कार घरासमोरील अंगणात लावलेल्या होत्या. बुधवार, २९ जून रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पार्किंगला लावलेल्या दोन्ही कार पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहनांना आग लावून जाळपोळ करणाऱ्यांनी चिठ्ठी लिहून १० लाख रूपयांची मागणी केली होत. चिठ्ठीच्या खाली सुलतान भाई गब्बर गँग असा उल्लेख केला होता त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी अडकले जाळ्यात
या गुन्ह्याचा शोध सुरू असतांना ६ जुलै रोजी पुन्हा अज्ञात व्यक्तीने व्हॉटसॲपच्या माध्यमातून १० लाखांऐवजी १५ लाखांची मागणी करत कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ११ जुलै रोजी पुन्हा मॅसेज करून एकाच्या घरात भाडेकरू सुरेश रमेश लहासे (रा.पहूर, ता.जामनेर) राहत असलेल्या व्यक्तीकडे मोबाईल देण्यास सांगितले. त्यावरून पोलिसांना संशय बळावला. दरम्यान, सांगिलेल्यानुसार, फिर्यादी यांनी लहासे याला नवीन मोबाईल दिला त्यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. मंगळवार, १२ जुलै रेाजी सकाळी अज्ञात व्यक्तीने सुरेश लहासे याला मोबाईल घेवून यावल येथे येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. सुरेश लहासे हा अजिंठा चौकात (एम.एच.२० ई.जे ५९४२) कारमध्ये एकासोबत बसलेला पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी कारचा पाठलाग करून यावल गाठले. यावल येथील पंचायत समितीच्या आवारात गाडी लावलेली दिसून आली. पोलिसांनी सापळा रचून संशयीत आरोपी सुरेश रमेश लहासे (रा.पहूर, ता.जामनेर) आणि राजू समाधान कोळी रा. (गोदरी, ता.जामनेर) यांना अटक केली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना मंगळवारी दुपारी यावालेतून अटक करण्यात आली. आरोपींच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !