उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई : राज्याचे 29 वे तर शिवसेनेकडून तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. गुरुवारी सायंकाळी शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ‘मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा शब्दात बरोबर 6.40 वाजता उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, द्रमुकचे अध्यक्ष एम. के स्टॅलिन, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, राजू शेट्टी, छगन भुजबळ, अजित पवार, आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी उपस्थित होते.

